यवतमाळ : वणी उत्तर क्षेत्रातील वेकोलिच्या उकणी कोळसा खाणीत नुकत्याच झालेल्या भूस्खलनाच्या घटनेनंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या भीषण अपघातात मातीचा ढिगारा कोसळून दोन डंपर दबले गेले होते, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. (पाण्यासाठी महिला चढली टॉवर वर)
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी डंपर चालक राजू आसुटकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. कठीण प्रसंगात समयसूचकता दाखवून सुखरूप बाहेर पडलेल्या राजू यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली आणि आसुटकर कुटुंबाला धीर दिला. संकटाच्या वेळी राजू यांनी दाखवलेली हिंमत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या दौऱ्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वेकोलिच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून अपघाताच्या कारणांचा आढावा घेतला. खाणीतील कामाचे स्वरूप आणि सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. खाणीत राबणाऱ्या प्रत्येक कामगाराची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी, असे सांगून त्यांनी सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या.
याप्रसंगी वेकोलिचे क्षेत्रीय प्रबंधक खन्ना साहेब, काँग्रेस प्रदेश सचिव संजय खाडे, वसंत जिनींगचे अध्यक्ष प्रमोद वासेकर, नगरसेवक नंदकिशोर आसुटकर, तालुका अध्यक्ष विक्की पानघाटे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या संपूर्ण घटनेचा आपण पाठपुरावा करणार असल्याचेही खासदारांनी यावेळी स्पष्ट केले.
Leave a Comment