Shankarpur-Bhisi Road वर काळाचा घाला: अज्ञात वाहनाच्या धडकेत २ ठार

May 11, 2026 by Prakash Hande

भिसी - चिमूर तालुक्यातील शंकरपूर - भिशी मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून, एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना ११ मे रोजी सकाळी ११ ते १२ वाजेच्या सुमारास घडली असून, या अपघातामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. (शिरपूर रोडवर दुचाकी-चारचाकी वाहनाच्या अपघातात यवतमाळ मधील युवक ठार)

 

मिळालेल्या माहितीनुसार, विकास दादाजी जांभुळे (वय ३७ वर्ष, रा. टिटवी, ता. चिमूर) आणि अमोल अरुण नन्नावरे (वय ३९ वर्ष, रा. शेगाव खुर्द, ता. भद्रावती) हे दोघे तरुण आपल्या दुचाकीने (क्रमांक MH 34 BA 8095) कामानिमित्त जात होते. सकाळी ११ ते १२ च्या सुमारास शंकरपूर - भिशी रोडवर एका भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून भीषण धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, दोन्ही तरुण दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्यामुळे विकास आणि अमोल या दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहन चालक आपले वाहन घेऊन तातडीने पसार झाला.

 

अपघाताची माहिती मिळताच भिशी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे टिटवी आणि शेगाव खुर्द या दोन्ही गावांवर शोककळा पसरली असून, दोन तरुण मुलांचा असा अचानक अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

या प्रकरणी भिशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघ, पोलीस शिपाई दुर्गेश नन्नावरे, सुनील घोडमारे आणि सूरज गुरुनुले पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, फरार वाहनाचा शोध घेण्यासाठी परिसरातील प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Comment

+