Shegaon murder case: किरकोळ वादातून हत्याकांड, 65 वर्षीय व्यक्तीला दगडाने ठेचले

May 12, 2026 by Prakash Hande

वरोरा - वरोरा तालुक्यातील शेगाव बु. परिसरात मंगळवारी सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला असून एका किरकोळ वादाचे पर्यावसान थेट हत्येत झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. शेगाव येथील आष्टा बायपास रोडवर सकाळी आठ वाजेच्या सुमारास नालेसफाईचे काम सुरू असताना दोन मजुरांमध्ये शुल्लक कारणावरून जुंपली. हा वाद सोडवण्यासाठी स्थानिक रहिवासी विश्वनाथ परसराम कांबळी (६५) हे मध्यस्थी करायला गेले असता, वादाने अंध झालेल्या आरोपीने त्यांच्यावरच हल्ला चढवला. (कुरकुरे घेण्यासाठी आला आणि लाखोंची चैन घेऊन पळाला)

 

नागपूर जिल्ह्यातील दहेगाव जोशी येथील रहिवासी असलेल्या महेंद्र रमेश भुरे (३६) या आरोपीने विश्वनाथ कांबळी यांच्या डोक्यावर दगडाने सपासप वार करून त्यांना जागीच ठार केले. या भीषण घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित जमावाने त्याचा पाठलाग सुरू केला आणि तत्काळ पोलिसांना माहिती दिली. शेगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अत्यंत वेगाने चक्रे हलवली आणि अवघ्या एका तासाच्या आत आरोपी महेंद्र भुरे याला बेड्या ठोकल्या.

 

या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण असून स्थानिक कंत्राटदारांच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्राप्त माहितीनुसार, नालेसफाईचा हा ठेका एका माजी ग्रामपंचायत सदस्याच्या जवळच्या व्यक्तीला देण्यात आला असून संबंधित ठेकेदाराकडे बाहेरून आलेल्या मजुरांच्या ओळखीचा कोणताही ठोस पुरावा किंवा माहिती उपलब्ध नव्हती. ठेकेदाराला यासंदर्भात विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची ओळख न पटवता त्यांना गावात कामावर ठेवणे किती घातक ठरू शकते, याचा प्रत्यय या घटनेने आला आहे.

शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत तब्बल १०२ गावांची जबाबदारी असून अपुऱ्या पोलीस बळामुळे गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने येथे तातडीने कर्मचारी वाढवावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे. घटनेची माहिती मिळताच चिमूर येथील फॉरेन्सिक टीम आणि चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस करत आहेत.

Leave a Comment

+