चंद्रपूर - पुतण सुनेच्या भावाच्या लग्नाचा हळदीच्या कार्यक्रमाला निघालेले पती-पत्नी राजुऱ्यावरून घुग्गुस कडे निघाले मात्र वाटेतच त्यांच्या पर्स मधील दागिने व रोख असा एकूण २ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोर पसार झाले. याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (पेट्रोल पंपावरून कार चोरी)
९ मे रोजी राजुऱ्यातील शुभांगी किशोर पडवेकर व किशोर पडवेकर घुग्गुस मध्ये लग्न हळदीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी सायंकाळी ४ वाजता घरून निघाले, ५.१५ वाजताच्या सुमारास पडवेकर दाम्पत्य चंद्रपूर बस स्थानकावर पोहोचले. शुभांगी यांनी घरून निघताना सर्व दागिने सोबत घेतले होते. कारण घरी दागिने ठेवल्यास चोरी होण्याची भीतीमुळे त्यांनी ते सोबत आपल्या पर्स मध्ये ठेवले होते.
चंद्रपूरला पोहोचल्यावर त्या घुग्गुस जाणाऱ्या बसच्या प्लॅटफॉर्म वर गेले, ६ वाजताच्या सुमारास घुग्गुस ला जाणारी बस आली, बस मध्ये बसल्यावर तिकिटासाठी त्यांनी पर्स बघितली असता पर्सची चैन उघडी होती. त्यामधील लहान पर्स दिसून न आल्याने त्यांनी आरडाओरडा सुरु केला. पडोली पोलीस स्टेशनपुढे बस थांबविण्यात आली. बसमधील प्रवाश्यांची चौकशी करण्यात आली मात्र त्यांची पर्स मिळून आली नाही.
पर्स मध्ये सोन्याची चपलाकंटी, गोप, अंगठ्या, कानातले टॉप असे ८४ ग्राम सोन्याचे दागिने व रोख रक्कम ४ हजार रुपये एकूण २ लाख ५६ हजारांचा ऐवज अज्ञाताने लंपास केला. याप्रकरणी शुभांगी पडवेकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
Leave a Comment