चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील रोशन शिवदास कुळे यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या आर्थिक संकटाला अखेर दिलासा मिळाला आहे. सावकारीच्या जाचामुळे आणि कर्जाच्या विळख्यात अडकून किडणी विक्रीसारख्या अत्यंत वेदनादायी घटनेला सामोरे जावे लागलेल्या रोशन कुळे यांच्या मदतीसाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लक्ष रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
रोशन शिवदास कुळे यांची सावकारी कर्जामुळे आर्थिक अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्यांच्या शेतजमिनी सावकारांकडे गहाण असल्याने संपूर्ण कुटुंब अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर रोशन कुळे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात येत आपली कैफियत मांडली होती. त्यांच्या कुटुंबाची व्यथा ऐकल्यानंतर आ. मुनगंटीवार यांनी तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करत या प्रकरणात मदत देण्याची आग्रही मागणी केली होती.
यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लक्ष रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी शासनाकडे अधिकृत पत्रव्यवहार करत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित विभागांशी समन्वय साधत हे प्रकरण संवेदनशीलतेने मांडले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी रोशन कुळे यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लक्ष रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेतला. (अल निनोच्या धोक्यामुळे जलयुक्त शिवाराची कामे जवळपास पूर्ण)
या मदतीमुळे संकटाच्या अंधारात सापडलेल्या कुळे कुटुंबाला मोठा मानसिक आणि आर्थिक आधार मिळाला आहे. अनेक दिवसांपासून सावकारीच्या जाचाने, कर्जाच्या ओझ्याने आणि भविष्यातील चिंतेने खचलेल्या या कुटुंबासाठी ही मदत म्हणजे नव्या आशेचा किरण ठरली आहे. “आमच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि वेदनादायी काळात आमचे दुःख समजून घेत मदतीसाठी धावून येणारे नेतृत्व म्हणजे आ. सुधीर मुनगंटीवार. त्यांच्या संवेदनशील भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला,” अशा शब्दांत कुळे कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त करत आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहे.
दरम्यान, येत्या १९ तारखेला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रोशन कुळे यांना ५ लक्ष रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकरणात संवेदनशील भूमिका घेत विशेष मदत मंजूर केल्याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
Leave a Comment