चंद्रपूर - आजच्या आधुनिक युगात मोबाईल हा जीवनाचे महत्वाचे अंग बनले आहे, मात्र जेव्हा मोबाईल चोरीला जातो त्यावेळी त्यामधील बँकिंग डिटेल्स, डेटा, महत्वाचे फोटो, शैक्षणिक माहिती संपूर्ण नष्ट होते, मोबाईल चोरी झाल्यावर नेमकं काय करायच हे अनेकांना ठाऊक नसते. मागील वर्षभरात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेकांचे मोबाईल विविध ठिकाणाहून चोरी झाले होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मोठी कामगिरी करीत एकूण ११८ मोबाईल शोधून काढण्यात यश मिळविले. (बल्लारपूर ते मुंबई रेल्वे सेवेला मंजुरी)
चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षभरात असंख्य मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या, याबाबत अनेक तक्रारी पोलिसांना विविध पोलीस स्टेशनद्वारे प्राप्त झाल्या होत्या, त्या अनुषंगाने पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करीत CEIR या पोर्टलचा वापर करीत एकूण ११८ मोबाईल सह एकूण १२ लाख ६३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल शोधून काढला.
चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालयात आज १२ मे रोजी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते सदर मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांची उपस्थिती होती. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी चंद्रपूर पोलीस दलाचे आभार मानले.
नागरिकांनी जुना मोबाईल घेताना सतर्क रहावे व काही नियम पाळावे जसे जुना मोबाईल खरेदी करताना नेहमी मूळ बिल तपासावे, बिलाशिवाय खरेदी केलेला मोबाईल चोरीचा असू शकतो, मोबाईलचा IMEI क्रमांक नोंदवून ठेवावा, मोबाईल हरविल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल हरविल्याची तक्रार नोंदवावी. हरविलेल्या मोबाईलचे सिम कार्ड त्वरित ब्लॉक करावे, त्याच क्रमांकाचा नवा डिम कार्ड घ्यावा, नवीन सिमकार्डवरील sms सेवा सुरु झाल्यावर २४ तासात भारत सरकारच्या ceir.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपला मोबाईल ब्लॉक केल्यास तो कुणालाही वापरता येणार नाही.
मोबाईलमध्ये नेहमी सुरक्षित पासवर्ड, pattern किंवा बायोमेट्रिक लॉक ठेवा, गुगल ड्राईव्ह व आयक्लाऊड वर डेटाचा नियमित बॅकअप घ्यावा जेणेकरून फोन हरविल्यास माहिती सुरक्षित राहणार. असे महत्वाचे आवाहन चंद्रपूर पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले.
Leave a Comment