Adhir Junnawar Skating : चंद्रपूर - शहराच्या क्रीडा इतिहासात अभिमानाची नोंद होईल असा एक प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक सोहळा आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा महानगर कार्यालय येथे पार पडला. अवघ्या ४.५ वर्षांच्या कोवळ्या वयात आपल्या जिद्द, मेहनत आणि देशप्रेमाच्या जोरावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेणाऱ्या चि. अधीर अमृता सुबोध जुन्नावार या उदयोन्मुख स्केटिंग स्टारचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार किशोरभाऊ जोरगेवार व अन्य मंचावरील मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास माजी आमदार सुधाकर कोहळे, भाजपा नागपूर पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख व माजी उपजिल्हाधिकारी सुधीर दिवे, जेष्ठ नागरिक संघ रामनगर, चंद्रपूर तसेच श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (चंद्रपूरचा पारा चढला, प्रशासनाचा ऍक्शन प्लॅन वाचा)
अवघ्या जून २०२५ पासून इनलाईन स्केटिंग या क्रीडा प्रकारात पदार्पण करणाऱ्या अधीरने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधत अंडर-५ गटात चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव स्केटिंग खेळाडू म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या मेहनती, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीमुळे तो आज राज्य व राष्ट्रीय स्तरावर झेप घेणारा आशादायी खेळाडू म्हणून उदयास आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या (२६ जानेवारी) पवित्र दिवशी अधीरने हातात तिरंगा घेऊन गांधी चौक ते जटपुरा गेट हे अंतर अवघ्या ७ मिनिटांत पूर्ण करत देशभक्तीचा प्रेरणादायी संदेश दिला. या अद्वितीय कामगिरीची नोंद ११ मार्च २०२६ रोजी Asian Book of World Records मध्ये करण्यात आली असून, ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची व ऐतिहासिक बाब ठरली आहे.
अधीरने विविध स्पर्धांमध्ये भाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले असून Young Achievers Olympiad मध्ये सुवर्णपदक (प्रथम क्रमांक) मिळवले आहे. तसेच डिसेंबर २०२५ मध्ये नागपूर येथे झालेल्या Open State Level Competition मध्ये सहभाग नोंदवला, २५-२६ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर येथे झालेल्या National Championship मध्ये राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली, तसेच District Level Championship (चंद्रपूर) आणि Daily Bhaskar Skating Competition (नागपूर) मध्येही पदक विजेता ठरला आहे. Chandrapur Skating Star
अधीरच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचा विविध स्तरांवर गौरव करण्यात आला असून माउंट कार्मेल कॉन्वेंट स्कूल येथे फादर बिपीन यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला आहे. तसेच “मनोमिलन २०२६” (आर्य वैश्य समाज) कार्यक्रमातही त्याचा सत्कार करण्यात आला असून विविध सामाजिक व शैक्षणिक मंचांवर त्याच्या कर्तृत्वाचा गौरव होत आहे.
यावेळी आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात अधीरच्या जिद्दीचे व कर्तृत्वाचे कौतुक करताना सांगितले की, “अधीरसारखा लहानगा खेळाडू आपल्या मेहनतीच्या जोरावर संपूर्ण चंद्रपूरचे नाव उज्ज्वल करत आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. एवढ्या लहान वयात त्याने दाखवलेली शिस्त, आत्मविश्वास आणि देशप्रेम प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.” तसेच त्यांनी पुढे जाहीर केले की चंद्रपूर शहरात स्केटिंग खेळाला चालना देण्यासाठी आधुनिक स्केटिंग ग्राउंड उभारण्यासाठी ₹२५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. अधीरच्या क्रीडा प्रवासात कोणतीही अडचण आल्यास त्याला पूर्ण सहकार्य करण्यात येईल तसेच राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी त्याला आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असेही त्यांनी आश्वासित केले.
अधीरचा आत्मविश्वास, शिस्त, सातत्यपूर्ण सराव आणि देशप्रेम हे गुण प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत असून “लहान वय, मोठे ध्येय” हा संदेश त्याच्या यशातून स्पष्टपणे दिसून येतो. या सन्मान सोहळ्यामुळे चंद्रपूर शहरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थित मान्यवर व नागरिकांनी अधीरच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
Leave a Comment