Teacher Beaten । कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाला थोबाडीत मारली; चंद्रपुरात खळबळ

March 24, 2026 by Prakash Hande

Chandrapur Teacher Beaten : चंद्रपूर - मतदार यादी पुनर्निरीक्षण करण्यासाठी गेलेल्या शिक्षकाला नागरिकाने चोप दिल्याची घटना २३ मार्च रोजी चव्हाण कॉलोनी, डीआरसी वेकोलि चंद्रपूर या भागात घडली. या प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (साधूच्या वेशात आला अन अंगठी घेऊन पळाला)

 

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरवट मधील शिक्षक ४९ वर्षीय सुनील मारोतराव परसूटकर यांची चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी या कामाकरिता बीएलओ म्हणून नेमणूक करण्यात आली होती. शाळेच्या रिक्त वेळात किंवा सायंकाळी ते आपलं काम नियमित करीत आहे.

 

२३ मार्चला चव्हाण कॉलोनी डीआरसी या वेकोलिच्या भागात परसुटकर हे मतदार यादीमधील मॅपिंग करण्यासाठी मतदारांची माहिती गोळा करायला गेले होते, सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मतदाराच्या घरी गेले असता त्यांनी आवाज दिला, घरातून एक महिला आली, त्या महिलेला परसुटकर यांनी आपला परिचय देत कामाबाबत माहिती दिली.

 

तितक्यात त्या महिलेचा पती चंद्रशेखर भोजराज शिवरकर हे आतून आले, तू कोण इथे काय काम असे म्हणत परसूटकर यांना शिवीगाळी करीत त्यांच्या हातातील मतदारांच्या माहितीचे कागदपत्रे हिसकावली. माझ्या घरी कुणी यायचे नाही असा दम शिवरकर यांनी देत परसूटकर यांच्या गालावर थापड मारली. अचानक घडलेल्या या प्रसंगाने शिक्षक परसूटकर यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता शिवरकर यांनी पुन्हा पाठीमागून डोक्यावर थापड मारली.

शासकीय कामात अडथळा आणत कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी परसूटकर यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये शिवरकर यांच्या विरोधात कलम १२१ (१) व १३२ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

   

Leave a Comment

+